*'ब्लॅकमनी' न स्विकारताही*
*'शरद नगर' उभं राहिलं*
व्यवसाय मग तो कुठलाही असो, तो सुरू करताना त्या व्यवसायाची पूर्ण माहिती आधीच करून घ्यायची असते. स्वतः त्या व्यवसायामधे काही दिवस काम करून अनुभव घ्यायचा असतो. त्या व्यवसायातील सर्व काही माहिती मिळवल्यानंतर, सगळ्या खाचा - खोचा अनुभवल्यानंतर तो छोट्या प्रमाणात सुरू करायचा आणि हळु- हळु वाढवत न्यायचा, हे माझ्या व्यवसायीकतेचे सुत्रं आहे. *'एसपी फॉर्मुला'* म्हणून मी तो अनेक भाषणांतुन व लेखांतुन मांडला आहे. मी ही स्वतः याच माझ्या फॉर्मुल्याचा वापर कुठलाही नवा व्यवसाय सुरू करताना वापरतो. त्यामुळेच माझा एकही व्यवसाय आत्तापर्यंत तोट्यामधे गेलेला नाही.
*'शरद नगर'* उभारणीस सुरुवात करतानाही हाच फॉर्मुला वापरला. *'यशवंत नगर'* उभारणीचा अनुभव गाठीशी होताच. तरीही इतर बिल्डरांप्रमाणे हा व्यवसाय न करता वेगळ्या पद्धतीने, इतरांपेक्षा वेगळं काही करता येईल का ? या दृष्टीने विचार सुरू केला. त्यावेळी लक्षात आले की, बांधकाम व्यवसायामधे ब्लॅकमनीचा वापर खुप मोठ्या प्रमाणावर होतोय. या व्यवसायाचा मुख्य पायाच व आर्थिक स्त्रोत काळा पैसाच आहे. त्यामुळे चुकीच्या अनेक गोष्टी सातत्याने घडतात. ६०:४० चा फॉर्मुला जणूकाही सर्वमान्यच आहे. याचा सर्वाधिक फटका हा ग्राहकाला बसतो. ४० टक्के रकमेचा हिशोब कुठेही लागत नाही. कर्ज काढून वा कष्टाच्या पैशाने घर घेणारे फसतात. रजिस्टरही कमी किंमतीचेच होते. त्याचे अनेक तोटे भविष्यात ग्राहकाला सहन करावे लागतात. ही शुद्ध फसवणूक आहे. आत्तापर्यंतच्या व्यवसायांमधे माझ्याकडून कुणाचीही फसवणूक झालेली नाही. कुठल्याही पोलीस ठाण्यामधे साधी एनसीही कुठल्या ग्राहकाने नोंदवलेली नाही की कुठल्याही ग्राहकाला न्याय मागण्यासाठी न्यायालयामधे धाव घ्यावी लागलेली नाही. *एकाही ग्राहकाची फसवणूक होऊ नये व शांत झोप लागावी यासाठी 'ब्लॅकमनी' न स्विकारताच फ्लॅट विकायचे, ब्लॅकमनीचा शिरकाव 'शरद नगर' मधे होऊच द्यायचा नाही ;* असे ठरवून जाहिरात करायला सुरुवात केली. *'आम्ही ब्लॅकमनी स्विकारत नाही'* असे ठळक अक्षरामधे लिहिलेले बॅनर जागोजागी झळकले आणि चर्चेला उधाण आले. उलट - सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावेळी बांधकाम व्यवसायामधे ६०:४० चा फॉर्मुला तेजीत होता. सर्वमान्यही होता. देशभरातील बांधकाम व्यवसायामधे हा फॉर्मुला आजही वापरला जातोय.
फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकाने बिल्डरला एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम 'व्हाईट' मधे म्हणजे चेक स्वरूपात द्यायची आणि ४० टक्के रक्कम 'ब्लॅक' मधे म्हणजेच रोख स्वरूपात द्यायची. सर्वच बिल्डर असे करतात. ते एक नागडे सत्य आहे. विशेष म्हणजे ग्राहकांचाही या 'ब्लॅक - व्हाईट' पद्धतीला विरोध नाही. देशभरातील बांधकाम व्यवसायामधे फ्लॅट विक्रीचा व्यवसाय असाच चालतो, यावर सर्वांचाच विश्वास आहे. कारण बिल्डरांनी जर का 'ब्लॅकमनी' घेतला नाही तर ते हा व्यवसाय करूच शकत नाही, अशी या व्यवसायाची परीस्थीती आहे. बिल्डरला प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागतात. लाच द्यावी लागते. या व्यवसायातील भ्रष्टाचाराला राजमान्यताच मिळाली आहे की काय ? अशी शंका येण्यापर्यंत व्यवहार राजरोस होतात. *सर्व शासकीय अधिकारी जणू काही शासनाचा नियम आहे अशा पद्धतीने स्क्वेअर फुटाचा दर लावून पैसे घेतात. शिपायापासुन ते थेट वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच दर हे रेटकार्डप्रमाणे ठरलेले. ते दिले नाहीत तर फाईल मंजुरच होत नाही. फाईल मंजुर करण्यासाठी दलालांचे रॅकेटही राजरोस कार्यरत. नगरविकास विभागामधे चालणारा भ्रष्टाचार हा खुल्लम - खुल्ला चालतो. सर्वांना सर्वकाही माहित असते आणि सर्वांचाच त्यामधे वाटा असतो.*
शासकीय कार्यालयातील 'देणी' दिल्यानंतरही बिल्डरांना पिडणारे अनेक महाभाग तयारच असतात. बिल्डरकडे प्रचंड 'ब्लॅकमनी' असतो आणि त्यावर आपलाच अधिकार आहे, आपल्यालाही त्यातील 'हिस्सा' मिळायलाच पाहिजे, असा हक्क सांगणारेही अनेक असतात. त्यामधे राजकारण्यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर गुंडांचा अर्थात दादा - भाईंचा. त्यांना तर सांभाळावेच लागते. नाहीतर साईट सुरूच होत नाही. जो पर्यंत बिल्डरांचे काम सुरू आहे तोपर्यंत येणारे सर्व सण - उत्सव सांभाळावे लागतात. मंडळांचे पदाधिकारी पावती बुक घेऊन तयारच असतात. इतरही सार्वजनिक कार्यक्रमांना देणग्या द्याव्याच लागतात. सर्वजण बिल्डरकडे मोठ्या 'आशेने' बघतात. बिल्डरला कुणालाही नाराज करून परवडणारे नसते. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून त्रास देणाऱ्यांची तर फौजच असते. त्यांना सांभाळावे लागते, पोसावे लागते. इतरही बऱ्याच गोष्टींसाठी पैसा खर्च होतो. त्यामुळे प्रत्यक्षात इमारत बांधकामाच्या आधीच बरीचशी रक्कम ही रोख स्वरूपात खर्च झालेली असते. हे सर्व व्यवहार रोखीने होतात. त्यासाठीच 'ब्लॅकमनी' वापरला जातो. बांधकाम व्यवसायामधे घेण्या- देण्यासाठी ब्लॅकमनीचा राजरोस व सर्रास वापर होतो. म्हणूनच बिल्डर ४० टक्के 'ब्लॅकमनी' घेतात, याचा अभ्यास आमचा आधीच झालेला होता. तरीही 'ब्लॅकमनी' घ्यायचा नाही किंवा द्यायचा ही नाही', हे ठरवूनच *'शरद नगर'* उभारणीस प्रारंभ केला.
*'आम्ही ब्लॅकमनी स्विकारत नाही',* हा ठळक अक्षरामधे शरद नगरच्या जाहिरात फलकांवर लिहिलेला मजकुर वाचुन अनेकांनी सल्ला दिला की, *"हा व्यवसाय मुळातच: ब्लॅकमनीवर आधारीत आहे. फ्लॅटच्या किंमती लाखोंच्या घरात असतात. ते घेणं हे ब्लॅकमनी ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच परवडते. तेच फ्लॅट घेतात. 'व्हाईट' मधे पैसे कमावणारे फ्लॅट घेऊच शकत नाही. ब्लॅकमनीवाले प्रकल्प सुरू होण्याआधीच प्रकल्पांमधे गुंतवणूक करतात. त्याचा फायदा बिल्डरांना होतो. तुझ्या या अशा जाहिरातींमुळे कुणीही दोन नंबरवाला येणार नाही. त्यातच तु पत्रकार. त्यामुळे कुणीही पैसे गुंतवणार नाही. तुझे शरद नगर उभारण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. म्हणून तडजोडीची तयारी ठेव. पैसा हा पैसा असतो. तो 'ब्लॅक वा व्हाईट' नसतो. बांधकाम व्यवसाय ज्या पद्धतीने केला जातो त्याच पद्धतीने कर. नाहीतर फसशील"* अनेकांनी अनेक प्रकारचे सल्ले दिले. मात्र कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना, आपण स्वतःवर काही बंधन घातली पाहिजेत. स्वतःसाठी का होईना पण नियम बनवले पाहिजेत. ठरवलेली तत्व पाळली पाहिजेत आणि धोरणं ठरवूनच त्याप्रमाणे व्यवसाय केला पाहिजे, नाहीतर अपयश येतं. हे मी माझ्या अनेक छोट्या - मोठ्या व्यवसायातुन अनुभवलं होतं. त्यामुळे मी बदलायला तयार नव्हतो. यश नक्की मिळेल, यावर माझा विश्वास होता.
खरं तर, कोणताही व्यवसाय इतरांपेक्षा वेगळेपणानं केला, तरच लोकं आकर्षित होतात. बांधकाम व्यवसायामधे 'ब्लॅकमनी' घेतल्याशिवाय व्यवसाय करूच शकत नाही, ही समजुत खोडून काढायची होती. आणि ते फक्त मीच करू शकतो, यावर माझा ठाम विश्वास होता, कारण मी पत्रकार होतो. तोही बऱ्यापैकी नावाजलेला. त्यामुळे माझ्याकडून कुठलाही अधिकारी वा कर्मचारी लाच मागु शकत नव्हता. कुठलाही दादा - भाई माझ्याकडून खंडणी उकळू शकत नव्हता की राजकारणी ब्लॅकमेल करू शकत नव्हते. 'एक्स्ट्रा मनी' खर्च होण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यातच मला कुठलेही वाईट छंद, नाद नव्हते. पैशाचा फार काही हव्यास नव्हता. मी जमिनीवरचा बिल्डर होतो. माझे खर्च मर्यादित होते. कुठलेही शान - शौक नव्हते. प्रचंड गरीबीतून आल्याने गरजाही खुप मर्यादित होत्या. दिखाऊपणा करण्याची मला गरज वाटत नव्हती. इतर बिल्डरांचा जो फालतु खर्च होतो, तो माझ्याकडून होण्याचा प्रश्नच येत नव्हता.
कुठलेही काम प्रामाणिकपणे आणि नियमाने करण्याचा माझा स्वभाव आहे. *खोटं केलं की ते निस्तरण्यासाठी वेळ व पैसा जातो, त्यापेक्षा नियमातच राहिलेलं बरं. खोटेपणाने कमावलेला पैसा हा खोट्याला झाकण्यासाठीच खर्च होतो. खरे काम करणाऱ्याला चुकीच्या पद्धतीने पैसे द्यावे लागत नाहीत.* म्हणूनच मी चुकीचे वा नियमबाह्य काम करून स्वतःला त्रास करून घेत नाही. 'शरद नगर' ला सुरुवात करण्याआधीही मी बांधकाम व्यवसायामधे होतो. मात्र कधी नया पैसा कुणाला लाच म्हणून दिली नाही. कुणी मागितलीही नाही. 'टाऊन प्लॅंनीग' अर्थात TP नावाचा महाकाय राक्षस प्रत्येक स्क्वेअर फुटाला पैसे घेतो. तरच फाईल क्लीअर करतो. माझी फाईल मात्र एकही नया पैसा न देता क्लीयर होते. *पैसे मिळणार नसल्याने अधिकारी सर्व नियमांचे पालन करून घेतात. एकही चुक शिल्लक ठेवत नाहीत. सर्व कागदपत्रांची व नियमांची पूर्तता करूनच परवानगी दिली जाते. एकही चूक स्वीकारली जात नाही. त्याचा भविष्यात मला फायदा होतो. कुणी कितीही तक्रारी केल्या, तरीही काही फरक पडत नाही. लाच न दिल्याचा हाही मोठा फायदा असतो.*
अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांच्याकडून खोटं वा चुकीचं काम करून घेतलं की ते भूत कायमचं मानगुटीवर बसते. कधी ना कधी ते बाहेर येतं. आणि मग पुन्हा लाच देऊनच ते मिटवावं लागतं. कधीही चुकीचं वा खोटं काम करून घेणं फायद्याचं नसतं. त्यापेक्षा खरं काम करूनच पुढे जाणं गरजेचं असतं. आज २०२५ मधे माझ्या व्यवसायाला २५ वर्ष पूर्ण होताहेत. *मी अभिमानाने सांगतो की या २५ वर्षाच्या बांधकाम व्यवसायामधे मी कुणालाही लाच दिलेली नाही की 'ब्लॅकमनी' कधीही स्वीकारलेला नाही.* 'शरद नगर' च्या सुरुवातीपासुन आजपर्यंत मी जेवढे फ्लॅट विकले आहेत किंवा त्याआधीही जेवढे फ्लॅट विकले आहेत, त्यापैकी एकही फ्लॅट धारक सांगु शकणार नाही की, शरद पाटील यांनी आमच्याकडून ब्लॅकने पैसे घेतलेत. ६०:४० चा फॉर्मुला आम्ही केव्हाच मोडीत काढला आहे. सर्वच ग्राहकांशी पारदर्शकरित्या व्यवहार केला आहे. चेक द्वारेच पैसे स्वीकारले आहेत.
या पारदर्शक व 'व्हाईट मनी' स्विकारण्याचा फायदा असा झाला की, सर्वसामान्य व 'व्हाईट मनी' धारकांचा आमच्यावर विश्वास बसला. आमच्याकडे दोन नंबरवाले किंवा ब्लॅकमनीवाले कुणीही आले नाहीत. मात्र जे सरकारी कर्मचारी होते, जे १० टक्के रक्कम भरून उरलेल्या रकमेचे कर्ज घेऊन फ्लॅट घेणारे होते, त्यांची संख्या वाढली. खऱ्या आणि चांगल्या लोकांचा ओढा शरद नगरकडे सुरू झाला. सर्वच बँकांनी चांगली साथ दिली. कुठल्याही बँकेत गेलं आणि शरद नगरचं नाव सांगितलं की कर्ज मंजुर होतं.
*'आम्ही ब्लॅकमनी स्वीकारत नाही'.* या जाहिरात पत्रकावरील एका वाक्यानेच 'ब्लॅकमनी' वाले बाद झाले आणि 'व्हाईटमनी' वाले शरद नगर मधे आले. समाजामधे फ्लॅट घेणारी दोन प्रकारची लोकं राहतात. एक श्रीमंत वर्ग व दुसरा मध्यम वर्ग. हा मध्यमवर्गीय आमच्या नजरेसमोर होता. आम्ही त्या दृष्टीने त्यांना हवा असलेला पारदर्शकरित्या व्यवहार सुरू केला होता. तो त्यांच्या मनाला भावला. त्यांनाही अभिप्रेत असलेला 'व्हाईट मनी' चा पारदर्शकरित्या व्यवहार करणारा बिल्डर पर्याय म्हणून आमच्या रूपाने मिळाला. जे कुठलाच बिल्डर करत नव्हता ते करण्याचं धाडस आम्ही केलं आणि ते यशस्वी झालं.
या 'व्हाईट मनी' च्या व्यवहाराचा फायदा आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॅकमनीवर घातलेल्या निर्बंधानंतर आणि रेरा कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाला. आर्थिक मंदीचे सावट या बांधकाम व्यवसायावर घोंघावत असतानाही आम्हाला काहीही फरक पडला नाही तो यामुळेच. नरेंद्र मोदींनी ब्लॅकमनी धारकांना चांगला चाप लावला होता. कुणीही ब्लॅकमनी बाहेर काढत नव्हते. सर्वजण चौकशांना घाबरून होते. त्यामुळे बांधकाम व्यवसाय जवळपास ठप्प झाला होता. अगदी त्यावेळीही आम्हाला तसुभरही फरक पडला नव्हता. कारण ब्लॅकमनीवाले आमच्याकडे येतच नव्हते. रेरा कायदा आल्यानंतर अनेक बिल्डर या व्यवसायातुन बाद झाले. मोदींच्या ब्लॅकमनी विरुद्ध धोरणामुळे अनेक बिल्डर अडचणीत आले. त्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागला. आमचे मात्र नया पैशांचेही नुकसान झाले नाही. उलट फायदाच झाला. आम्ही सुरुवातीपासून 'पारदर्शक व्यवहार' व 'व्हाईट मनी' या दोन तत्त्वांवर ठाम राहिलो आणि शरद नगर मधे 'ब्लॅक मनीचा' शिरकाव होऊ दिला नाही. 'ब्लॅकमनी' न घेताही बांधकाम व्यवसाय यशस्वी होऊ शकते याचे शरद नगर हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच, *"मी आज पर्यंत कुणालाही कुठल्याही कामासाठी वा परवानगीसाठी एक नया पैसाही दिलेला नाही की, कुठल्याही फ्लॅट धारकाकडून नया पैसाही ब्लॅकने घेतलेला नाही," हे मी मोठ्या अभिमानाने सांगु शकतो.*
*•शरद यशवंत पाटील*
*संस्थापक, शरद नगर,*
*वाडा, जि. पालघर.*
*(M) 8600001111*
ब्लॉग
ब्लॅक मनी न स्वीकारताही शरद नगर उभ राहिलं
